नीलेश शहाकार/बुलडाणा : माल, वस्तू, सेवा खरेदी करताना दुकानदार बरेचदा इलेक्ट्रॉनिक मापक उपकरणामध्ये फेरबदल करुन ग्राहकांची फसवणूक करतात. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजनमापांना पेपरसील लावून सुरक्षित करण्याचा निर्णय नियंत्रक वैध मापक विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी राज्यातील बारा हजार टपाल कार्यालयांची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी टपाल कार्यालयासोबत करार केला जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराला पहिले १0 सील घेण्यासाठी १८ रूपये प्रति सील एवढे शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामध्ये पोस्टाचे १0 रुपये व आरबीआयचे ८ रुपये एवढे कमिशन राहणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक सीलसाठी असणारी किंमत ही २२ आणि ८ रूपये अशी राहील. एका व्यापार्यास साधारणपणे ५ सिल घेता येणार आहे. प्रत्येक सीलसोबत पडताळणी फी २ हजार रुपये आणि विलंब फी २0 रुपये असे २0२0 रुपये भरावे लागणार आहे. मोठय़ा उत्पादकांना किमान १00 सिल एकावेळी खरेदी करावी लागतील व प्रत्येकी किंमत १0 रुपये एवढी राहील. राज्यातील १२ हजार पोस्ट कार्यालयांतून या सीलची विक्री केली जाणार आहे. व्यापार्याचे नाव, पत्ता, वजनमापाचा तपशिल व विक्री झालेल्या सीलची सर्व माहीती अधिकार्यांना विशिष्ट संगणक प्रणालीद्वारे उपलब्ध केली जाणार आहे. शिवाय सील लावण्यात आले की नाही, याची विभागाकडून पडताळणी करण्यात येईल. प्रत्येक पेपर सीलला अनुक्रमांक देण्यात येणार आहे. विभागाने तयार केलेला छापील नमुना अर्ज भरुन ते विकत घेता येईल. विकत घेतल्यानंतर हे सील त्या तोलन मापन उपकरणास योग्य ठिकाणी लावावे लागेल. तपासणी दरम्यान ते लावले नसल्याचे आढळल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. विशेष म्हणजे या प्रकारात तडजोड करण्यात येणार नाही. दरम्यान वैध मापन विभागाचे सहाय्यक नियंत्रक कमलाकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नियंत्रक, वैध मापन विभाग, मुंबई यांनी प्रत्येक जिल्हा वैध मापक कार्यालयास पत्र पाठवून जिलतील वजनमापकाचे आकडे मागविले आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरु आहे; मात्र राज्यभरात अंमलबजावणीबाबत अद्याप स्पष्ट आदेश प्राप्त झाले नाही.
*किराणा दुकानातून होईल सुरुवात
या सीलची वैधता एक ते दोन वर्षापर्यंत राहणार असून किराणा दुकानात वापरण्यात येणार्या वर्ग ३ च्या इलेक्ट्रॉनिक तोलन मापक उपकरणापासून सुरुवात करणार येणार आहे. सीलसाठी भरायचे सर्व शुल्क डीडीद्वारे भरता येईल. पोस्ट कार्यालयातर्फे जमा झालेली फी आरबीआयला पाठवीली जाईल. त्यानंतर ती वैधमापन विभागाकडे हस्तांतरीत होऊन शासकीय तिजोरीत जमा केली जाईल.
*जुने सील बाद
आधी प्रत्येक इलेक्ट्रॉनिक तोलन मापक उपकरणाला शिशाची कोडींग असलेले ताराचे सील लावले जात होते; मात्र बरेच वेळा हे सील खोलून तोलन मापकाची सेटींग बदलण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे हे जुने सील बाद होणार आहे. शिवाय जुन्या तोलन मापकाला या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.