मुंबई - एकीकडे पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपिट व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रांवरती विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेड द्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेड कडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. राज्य सरकारने नाफेडला सांगून सदर प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.
बीड जिल्ह्यात केवळ 5 हरभरा खरेदी केंद्रे सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले. तसेच नाफेड कडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मान्य करायला लावण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी आग्रही मागणी धनंजय मुंडे यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची दखल घेऊन नाफेडने हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे, काही हरभरा खरेदी केंद्रांनी मागील वर्षी खरेदीत अनियमितता केल्यामुळे नाफेड कडून प्रस्ताव तपासून घेतले जात आहेत. तरीही शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून खरेदी केंद्रांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढले जावेत, अशा सूचना नाफेडला करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना दिली.