मुंबई : ‘पेंग्विन झाला रे पेंग्विन झाला, शिवसेनेचा पेंग्विन झाला, पोपट झाला रे पोपट झाला शिवसेनेचा पोपट झाला’ अशा शिवसेनेला डिवचणाऱ्या घोषणा अन् प्रचंड गदारोळ, त्यातच टाळांचा आवाज, कर्जमुक्तीचे फडकविलेले फलक असे चित्र आज वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडत असताना दिसले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर कालपर्यंत अडून बसलेली पण आज शांत असलेली शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या टार्गेटवर होती. एकेकाळी शिवसेनेत असलेले राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी मग, पेंग्विन, पोपटाच्या घोषणा सुरू केल्या. घोषणा आणि टाळांच्या आवाजावर त्यांनी नृत्याचा ठेकाही धरला. त्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे जाणवले. मंत्री एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, अनिल कदम, जयप्रकाश मुंदडा, विजय औटी आपसात बोलले पण शिवसेनेने आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देण्याऐवजी संयम बाळगला. संपूर्ण भाषणभर विरोधकांनी वेलमध्ये राहून घोषणाबाजी केली. ‘उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा मग महाराष्ट्रात फक्त आश्वासन का’, असे लिहिलेले फलक फडकावले. या फलकाआड मुनगंटीवार झाकले जावेत यासाठी फलक कॅमेऱ्यासमोर उंचावण्याची अपयशी धडपडही विरोधकांनी केली. ‘देवेंद्र सरकार काय म्हणते, मोदी सरकार काय म्हणते कर्जमाफी नाही म्हणते, सुधीर पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाही म्हणतो, ‘अच्छे दिन कहा गए,मोदी जी कहा गए’, असा घोषणांचा धोशा सुरूच होता. काही सदस्य टाळ वाजवित होते. अध्यक्षांनी ते बंद करण्यास सांगितल्याचा काहीही परिणाम झाला नाही. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांतपणे बसून होते आणि इतर मंत्री, सत्तापक्ष आमदारांनाही शांत राहण्यास त्यांनी खुणेने सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी बाकावरील सर्वच सदस्य संपूर्ण भाषणभर उभे होते. (विशेष प्रतिनिधी) तब्बल दोन तासांचे भाषणसुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण तब्बल दोन तासांचे होते. पूर्वी अजित पवार वित्त मंत्री असताना विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता पवार हे अर्थसंकल्प ‘टेबल’ करून मोकळे झाले होते. सुधीरभाऊंनी मात्र गदारोळाची पर्वा न करता दोन तासांचे भाषण ठोकले.रक्ताच्या नात्यावर आमचे प्रेम : अल्पसंख्यांक समाजासाठी आर्थिक तरतूद जाहीर करताना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांच्याकडे बघून मुनगंटीवार म्हणाले, ‘लाल दिव्याच्या गाडीवर आमचे प्रेम नाही. लाल रक्ताच्या; माणुसकीच्या नात्यावर आम्ही प्रेम करतो.सौ मुनगंटीवारांची उपस्थिती : सुधीरभाऊ अर्थसंकल्प सादर करीत असताना त्यांच्या पत्नी सपना आणि कन्या शलाका प्रेक्षक दीर्घेमध्ये उपस्थित होत्या. सुधीरभाऊंनी मोठी घोषणा केली की त्या खुर्चीवर थाप देऊन आनंद व्यक्त करीत होत्या.काँग्रेसमुक्तीची सुरुवात वर्धेतून : स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करावी, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते. १९९३३ पासून १९४८ पर्यंत गांधीजी सेवाग्राम आश्रमात राहिले. त्याच वर्धा जिल्ह्यात सगळ्या नगरपालिका, पंचायत समित्या भाजपाने जिंकल्या आता जिल्हा परिषदेत सत्ताही येत आहे. काँग्रेसमुक्त भारताची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत आहे, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला. नार्को टेस्ट अन् नमामि चंद्रभागासभागृहात अर्थसंकल्प मांडला जात असताना उभे असलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले, ‘तुमची नार्को टेस्ट केली तर तुम्ही यांच्याबरोबर (विरोधकांबरोबर) नाही असेच दिसेल.!’ तर नमामि चंद्रभागा योजनेविषयी घोषणा करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, ‘इकडे (सत्तापक्षात) या आणि पवित्र व्हा. एकच पर्याय आता तुमच्यासमोर आहे.!’ मुनगंटीवारांच्या या टोलेबाजीला सत्ताधारी बाकांवरून चांगलीच दाद मिळाली.