ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक भायखळा येथील राणीबागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करत आहेत. मात्र राणीबागेची सफर करण्यासाठी मुंबईकरांना यापुढे थोडा खिसा खाली करावा लागणार आहे. कारण राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन आता महागणार आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याबाबतच्या प्रस्तावाला आता अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे पेंग्विन दर्शनासाठी आता प्रतिकुटुंब 100 रूपये शुल्क तर प्रौढांसाठी 50 रूपये शुल्क आकारलं जाणार आहे. लवकरच नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आणलेल्या पेंग्विनचे दर्शन १७ मार्चपासून मुंबईकरांना होऊ लागले आहे. पहिल्याच आठवड्यात पेंग्विन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. एकाच दिवसात 40हजार पर्यटक आल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे राणीच्या बागेत प्रवेशासाठी शुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका निवडणुकीपूर्वी आणण्यात आला होता. बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर केला. यानंतर तो पुढील मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला त्यावर आता महासभेचे शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच दरवाढ लागू होईल.
राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढवण्यात आले. मात्र, त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणी बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध सुरू झाला. याचा फायदा उठवत, भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. भाजपाचे संख्याबळ समान असल्याने हा प्रस्ताव फेटाळला गेल्यास नाचक्की होईल, याची शिवसेनेला धास्ती वाटू लागली. त्यामुळे दरवाढीवर फेरविचार करण्यास शिवसेनेने सुरुवात केली होती. अखेर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.