ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आठपैकी एका मादी पेंग्वीनचा रविवारी सकाळी ८.१७ च्या सुमारास मृत्यू झाला. पेंग्वीनचे शवविच्छेदन दुपारी १२.३० च्या सुमारास परळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागातील प्राध्यापकांच्या सहाय्याने करण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पेंग्वीनच्या मृत्यूचे कारण समजेल. सध्या प्राणिसंग्रहालयात इतर ७ (३ नर+४ मादी) पेंग्वीन पक्षी निरोगी असून, त्यांना सतत निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
२६ जुलै रोजी दक्षिण कोरिया येथून ८ पेंग्वीन पक्ष्यांना राणीच्या बागेत आणण्यात आले. त्यांना क्वारंटाईन क्षेत्रात ठेवण्यात आले. क्वारंटाईन सुविधा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार करण्यात आली आहे. पेंग्वीन पक्ष्यांना सुमारे तीन महिने क्वारंटाईन सुविधेत ठेवण्यात येत आहे. या कक्षातील तापमान १६ ते १८ डीग्री सेल्सिअस आहे. १८ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता एक मादी पेंग्वीन पक्षी सुस्त असल्याचे निदर्शनास आले. तिच्या विष्ठेचा रंग हिरवा होता. भूक कमी झाल्याचे व तिला श्वसनाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यावर पशुवैद्यकांकडून पेंग्वीनची तपासणी करत उपचार सुरु करण्यात आले. मात्र पेंग्वीनकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. १९ आॅक्टोबर रोजी पेंग्वीनची रक्त तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये यकृतात काही संसर्ग दिसून आल्याने याकरिताही उपचार सुरु करण्यात आले. मात्र या सर्व उपचारानंतर पेंग्वीनच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही; आणि २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.१७ च्या सुमारास पेंग्वीनचा मृत्यू झाला.