मुंबई : महापालिका निवडणुका पार पडून पंधरवडा उलटला तरी अद्याप मुंबईकर पेंग्विन दर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात सत्ता स्थापनेबाबत अनिश्चिती असल्याने आपल्या कारकीर्दीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची घाई शिवसेनेच्या शिलेदारांना लागली आहे. भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत दक्षिण कोरियातून आठ हम्बोल्ट जातीचे पेंग्विन महापालिकेने आणले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पाचा श्रेय महापालिका निवडणुकीत घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू होता. मात्र आॅक्टोबर महिन्यात एका पेंग्विनच्या मृत्यूने शिवसेना टीकेची धनी बनली. लोकायुक्त आणि झू एथोरिटी यांनी घेतलेला आक्षेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावर झालेल्या हानीनंतर पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले. त्यात पेंग्विनसाठी विशेष व्यवस्था करण्यातही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याने उद्घाटनाची तारीख तीनवेळा पुढे ढकलण्यात आली. मात्र निवडणुकीनंतरही पेंग्विनच्या दर्शनाला मुहूर्त नाही.महापालिका निवडणुकीत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे या बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे नगरसेवकपदाचे त्यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. म्हणून ८ मार्च ला नगरसेवकपदाचा काळ संपण्याआधी जाता जाता पेंग्विन उद्घाटन करून जावे, अशी या शिलेदारांची इच्छा आहे. तसा दबावही त्यांनी प्रशासनावर आणला आहे. पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकरांसोबतच माजी नगरसेवक आतुर झाल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)मुंबई: मुंबईकरांनाही पेंग्विनचा लाईव्ह शो बघू द्या, असे म्हणत उच्च न्यायालयाने दक्षिण कोरियामधून भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणलेल्या सात पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांसाठी खुले करण्यावर स्थगिती देण्यास नकार दिला. महापालिका त्यांची काळजी घेत नाही, असा निष्कर्ष घाईघाईत काढणार नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.>प्रशासनाने फेरले पाणी पेंग्विनसाठी आवश्यक असलेले वातावरण निर्मिती आणि पाणी नमुना तपासणी सुरु आहे. पाण्याचे नमुने अयोग्य असल्याने पेंग्विनना हानी पोहचू शकते. पाण्याचा नमुना चाचणीसाठी पाठवला आहे. तो योग्य आल्यास दोन-तीन दिवसात पेंग्विनना त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या काचेच्या घरात जातील. त्या नंतर १०-१५ दिवस पाहणी करून पेंग्विन दर्शन सुरु होईल, असे राणीबागचे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा हिरमोड झाला.>मुंबईकरांना लाइव्ह शो बघू द्या - हायकोर्टद. कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनची भायखळा प्राणीसंग्रहालय प्रशासन योग्य ती काळजी घेत नाही. त्याशिवाय मुंबईतील हवामान त्यांच्यासाठी पोषक नसल्याने त्यांना द. कोरियात पाठवावे, अशी मागणी चार-पाच वकिलांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत पेंग्विनचे दर्शन सामान्यांसाठी खुले करू नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला केली. त्यावर महापालिकेच्या वकिलांनी अद्याप पेंग्विनचे दर्शन लोकांसाठी खुले केले नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. पेंग्विना पुढील आठवड्यात क्वारेंटाईनमध्ये हलवण्यात येईल. तेथे त्यांना आवश्यक असलेले वातावरण तयार करण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेने खंडपीठाला दिली. ‘पेंग्विनची काळजी घेण्यात येत नाही, असा निष्कर्ष आम्ही काढणार नाही. त्यामुळे सामान्यांसाठी त्यांचे दर्शन खुले करण्यापासून आम्ही प्रशासनाला अडवू शकत नाही. मुंबईकरांनी पेंग्विनची मजा का घेऊ नये? त्यांनाही लाईव्ह शो पाहू द्या. अन्य देशांमध्ये नागरिकांना पेंग्विन पाहण्यास बंदी घातली आहे का?’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच सुनावले. जुलै २०१६ मध्ये द. कोरियामधून भायखळयाच्या प्राणीसंग्रहालयात आठ पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच पेटले.मात्र महापालिकेने उरलेल्या पेंग्विनसाठी क्वारेंटाईन बांधण्यास सुरुवात केली. क्वारेंटाईनचे काम पूर्ण झाले असून ७ किंवा ८ मार्चला त्यांना येथे हलवण्यात येईल.
‘पेंग्विन’ लगीनघाई...!
By admin | Published: March 04, 2017 1:41 AM