ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणे आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणे अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत मुक्कामासाठी आजपासून आले आहेत़ दक्षिण कोरिया येथील सेऊल महानगरातील कोएक्स मत्स्यालयातून हम्बोल्ट प्रजातीचे आठ पेंग्विनचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात आज आगमन झाले़ भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय उभे राहणार आहे़ या प्राणीसंग्रहालयात पेंग्विन हे विशेष आकर्षण ठरणार आहे़.
तीन वर्षांपूर्वी असे पेंग्विन आणण्याची घोषणा करण्यात आली़ अखेर अनंत अडचणी पार करीत दक्षिण कोरिया ते राणी बाग असा प्रवास करीत पेंग्विन मुंबईकरांच्या भेटीला आले आहेत़ यामध्ये तीन नर आणि पाच माद्या पेंग्विनचा समावेश आहे़ त्यांचे वय दोन ते तीन वर्षे आहे़ हम्बोल्ट पेंग्विन पक्षी हा चार ते २५ डिग्री अंश सेल्सिअस एवढ्या तपमानात राहू शकतात़ त्यामळे मुंबईतील वातावरणाशी या पक्षांनी जुळवून घेईपर्यंत सुरुवातीचे तीन महिने पेंग्विनला देखरेखीखाली वेगळ्या कक्षात ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर हम्बोल्ट पेंग्विनला प्रदर्शन कक्षात हलविण्यात येणार आहे़
एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़
सद्यस्थितीत १२ ते १५ सें़मी़ उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सें़मी़ इतकी होईल़ त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा कि़लो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़ पेंग्विनच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था प्राणीसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे १७०० चौफ़ूट क्षेत्रफळाचे संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आला आहे़.
त्याचे तापमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे़ या पेंग्विनच्या जीवशास्त्रीय गरजा ध्यानात ठेवून हे पक्षीगृह तयार करण्यात आले आहे़ बांगडे व मोरशीचा पाहुणचार या खास परदेशी पाहुण्यासाठी बांगडा आणि मोरशी माशाचा बेत आखण्यात आला आहे़ हेच या पक्ष्यांचा आहार असून दररोज त्यांना अर्धा ते एक किलो मासे खाद्य म्हणून पुरविण्यात येतील़ असा तयार केला बर्फाळ प्रदेश पेरु आणि चिल्ली या देशात पेंग्विन सापडतात़ या पक्ष्यांसाठी राणीच्या बागेत असलेल्या पिंजऱ्याला शंभर चौ़मी़ची काच असणार आहे़
या पिंजरा अर्धा पाण्याने भरुन त्यामध्ये रेती आणि समुद्र खडकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे़ या कक्षात ठेवण्यासाठी सुमारे सहा ते आठ हजार लीटर पाणी लागणार आहे़ मुख्य कक्षात स्थानांतरीत केल्यानंतर तेथे वर्षाला सुमारे ६० ते ८० हजार लीटर्स पाणी पुरवावे लागणार आहे़