लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेचा कारभार हाकणारी शिवसेना सध्या पेंग्विन आणि बॉलीवूडमधील ‘भार्इं’च्या घराची काळजी घेण्यात गुंतली आहे. भाजपा मात्र, सामान्य मुंबईकरांसाठी राबत आहे, अशा शब्दांत मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला. पेंग्विन दर्शन, राणीच्या बागेतील मासिक पास दरातील प्रस्तावित वाढ आणि बँडस्टँड येथील सलमान खानच्या घराबाहेरील प्रसाधनगृह हटविण्याच्या मागणीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तत्परतेने दिलेला प्रतिसाद आदी मुद्द्यांवरून सध्या शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे. त्यात आता पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील गहाळ फायलींची भर पडली आहे. २०१३ साली पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील तब्बल ३ हजार ७४७ फायली गायब झाल्याचे उघड झाले होते. यातील जवळपास निम्म्या फायली पुन्हा तयार करण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा करण्यात येत आहे. इमारत विभागातील गायब झालेल्या फायली परत मिळू लागल्याचे समोर येताच, भाजपाने त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. शिवसेनावाले सध्या पेंग्विन आणि बॉलीवूडमधील ‘भार्इं’च्या बिल्डिंगची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. भाजपा सामान्य मुंबईकरांसाठी झटत आहे, अशा शब्दांत नव्याने तयार होणाऱ्या फायलींचे श्रेय शेलार यांनी भाजपाकडे घेतले. या गहाळ झालेल्या फायलींची चौकशी व्हावी, यासाठी तीन वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. अलीकडेच मी स्वत: पोलीस उपायुक्तांची या संदर्भात भेट घेतली होती. पालिकेकडून तक्रार दाखल होण्याची वाट न पाहता, चौकशी सुरू करण्याची मागणी केल्याचे शेलार यांनी सांगितले. पेंग्विन दर्शन, तसेच राणीच्या बागेतील मासिक पासाच्या दरात भाजपा कसलीच वाढ सहन करणार नसल्याचा इशारा देतानाच,शिवसेनेच्या कारभारावरही त्यांनी टीका केली.
‘पेंग्विन, सलमानभोवती अडकली शिवसेना’
By admin | Published: May 10, 2017 2:50 AM