"उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 04:45 PM2024-06-17T16:45:11+5:302024-06-17T16:45:26+5:30

जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं.

People are dying like worms in the state where is the government says Nana Patole | "उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका

"उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole : राज्यातील काही भागात पाऊस सुरु झाला असला तरी अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. मात्र याबाबत गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण राज्य सरकार मात्र फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे आणि कमिशन घेणे यात मश्गूल आहे. सरकारला लोकांच्या जगण्या मरण्याचे काही घेणे देणे राहिले नाही, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

मंत्र्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च कोण करतंय?

"जून महिना संपत आला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. जनता भयंकर दुष्काळाचा सामना करत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. राज्यात टँकर माफिया आणि बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये उष्माघाताने अनेक लोकांचा मृत्यू झाला. पण सरकार कुठे दिसत नाही. राज्य एवढ्या भयंकर परिस्थितीचा सामना करत असताना सत्ताधारी पक्षाचे मंत्री परदेशात जाऊन थंड हवा खात आहेत. राज्यात उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू झाला आहे हे सरकारने जाहीर करावे. परदेशात जाण्यासाठी मंत्र्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते या मंत्र्यांनी ती परवानगी घेतली आहे का? यांचा परदेश दौऱ्याचा खर्च कोण करत आहे? या प्रश्नांची उत्तरे सरकारने जनतेला दिली पाहिजेत," असे नाना पटोले यांनी म्हटलं.

सरकारला जनतेच्या जगण्या मरण्याशी काही देणे घेणे नाही

"मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांवर आणि प्रशासनावर वचक राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या दारुण पराभवानंतर आपण पुन्हा सत्तेत येणार नाही. याची जाणिव झाल्यामुळे सरकारमधले लोक फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे आणि कमिशन घेणे एवढे एकच काम करत आहेत. त्यांना जनतेच्या जगण्या मरण्याशी काही देणे घेणे राहिले नाही. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे आणि निकालातील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत पण सरकारने अद्याप या गोष्टींची दखल घेतली नाही. राज्यातही प्रत्येक भरती परीक्षेचे पेपर फोडले जातात. बेरोजगार तरुण या गैरप्रकारांमुळे निराश झाले आहेत. काँग्रेस पक्ष आगामी अधिवेशनात या सर्व मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरून जाब विचारणार आहे," असे नाना पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा कोणताही फॉम्युला ठरलेला नाही. लवकरच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा होईल त्यानंतर एकत्रीत बसून मेरीटनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवू, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.
 

Web Title: People are dying like worms in the state where is the government says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.