मुंबई : कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा होणाऱ्या १ नोव्हेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांनी मुंबईतील करी रोड नाक्यावर रविवारी काळा दिवस म्हणून साजरा केला. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रात सीमाभागातील लोकांना विलीन करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी सरकारकडे केली.समितीने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेला बेळगाव १९५६ सालापासून अखंड महाराष्ट्रापासून विलग आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळाली असली, तरी सीमाभागातील लोकांना अन्यायकारक कर्नाटक राज्यात डांबले गेले. म्हणूनच कर्नाटक राज्यात १ नोव्हेंबर राज्योस्तव दिन म्हणून साजरा होत असला, तरी सीमाभागातील लोकांसाठी हा काळा दिवसच आहे. अखंड महाराष्ट्रातील लोकांना सीमाभागातील लोकांची कळकळ कळावी, म्हणून राजधानी मुंबईत हा काळा दिवस साजरा केला. याआधी करी रोड नाक्यावर अखंड महाराष्ट्राचा काळा दिवस साजरा करण्यास ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात होती. दिवाळी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चा काढण्यास परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे महाराष्ट्रातही सीमाभागातील लोकांचा आवाज दडपडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समन्वय समितीने केला. त्यानंतर पोलिसांनी नमती भूमिका घेत आंदोलनास सोमवारी रात्री परवानगी दिल्याचे समितीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>मुंबईकरांना विसरू नका!भौगोलिक सलगता, भाषावार प्रांतरचना, संस्कृती, बोलीभाषा या चार मूलभूत संविधानिक मुद्द्यांवर बेळगावसह आजूबाजूचे तालुके, गावे ही महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य भाग आहेत, असे समितीचे म्हणणे आहे. शिवाय मुंबईकर ज्या हुतात्मा स्मारकास वंदन करतात, त्या १०५ हुतात्मांपैकी २ हुतात्मे हे या सीमाभागातले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी अखंड महाराष्ट्राच्या या लढ्यात भविष्यातही सामील होण्याचे आवाहन समितीने केले आहे.
सीमा भागातील लोकांनी साजरा केला ‘काळा दिवस’!
By admin | Published: November 02, 2016 5:26 AM