प्रताप नलावडे, बीडदुष्काळाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक घट्ट करण्याचीही गरज आहे. सर्वकाही संपले, अशी भावना निर्माण झाल्यानेच शेतकरी गळफासाकडे वळत असताना, त्यांच्यात उभारी निर्माण करण्याचे आणि दुष्काळाशी चार हात करण्यासाठी बळ देण्याचे काम अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने हाती घेतले आहे. बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथून त्यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे.पाणीटंचाई हीच शेतकऱ्यांची मोठी समस्या असल्याचे लक्षात आल्यावर, नाना आणि मकरंद यांनी या समस्येबाबत काय करता येईल, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. साताऱ्यात डॉ. अविनाश पोळ यांनी पाणलोटच्या केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि पाणलोटची कामे केली, तर कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, या निष्कर्षापर्यंत आम्ही सर्व जण पोहोचलो, असे ‘नाम’चे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके सांगतात. त्यानुसार, बीड जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात कामसुरू करण्याचे ठरले. बीडपासून ८-१० किलोमीटर अंतरावरील लोळदगावया गावाची निवड यासाठी केली. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून ४ लाख रुपये जमा केले आणि बिंदुसरा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती आणि खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले, असे सांगत‘कृषी भूषण’ आणि नामचे जिल्हा समन्वयक शिवराम घोडके म्हणाले, ‘यामुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणारतर आहेच, परंतु शेजारच्याकिणीपाई, नामलगाव, कुर्ला आणि बेलापुरी या गावांनाही याचा फायदा होणार आहे.’नामचे महाराष्ट्र समन्वयक केशव आघाव यांनी स्वत:च्या ५ पोकलेन मशीन दिल्या असून, आणखी १५ मशीनची व्यवस्था केली आहे. मशीनच्या डिझेलसाठी काही डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. शासकीय पातळीवर दीड कोटी रुपयांचे बजेट असलेले काम लोकसहभागातून अवघ्या २० लाखांत पूर्ण होऊ लागले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामाने एक आदर्श निर्माण केला आहे. बीड जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली.
लोकसहभागाने दुष्काळाशी सामना
By admin | Published: January 04, 2016 3:13 AM