मुंबई : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पूजा खेडकर यांनी आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्यासंदर्भात सध्या चौकशी चालू आहे. याप्रकरणी आता राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत असून आमदार बच्चू कडू यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी असे लोक राजकारणात सुद्धा नसतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले, पूजा खेडकर यांच्याबद्दल काय-काय मी ऐकतोय, हे तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय. मात्र, असे लोक तर राजकारणात सुद्धा नसतात, असे सुद्धा अधिकारी असतात, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच, त्यांना खरंतर मसुरीला पाठवला होतं, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनीही पूजा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. आता काय राहिले? UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्या संस्थेवर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकरला पदावरुन बाहेर काढून तिला जन्मठेपेपर्यंत पोहोचवले पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करणार नाही, अशाप्रकारची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
आता पूजा खेडकर यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरीतून सूचना करण्यात आली आहे. तसेच, त्यांना मसुरी येथे २३ जुलैच्या आत हजर होण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्याद्वारे देण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला. वाशिम जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील प्रशिक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे.
दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ३ जूनला पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण सुरू झाले. मात्र, एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कामकाजादरम्यान स्वतंत्र कक्षाची मागणी, आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरणे आदी अनेक कारणांनी त्या चर्चेत आल्या. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून २५ पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवण्यात आला. त्यानंतर त्यांची तात्काळ बदली वाशिम येथे झाली होती.