मुंबई – आनंद दिघेंवर आजही ठाणेकर अतोनात प्रेम करतो. त्यांचे फोटो लावल्याशिवाय आजही कार्यक्रम होत नाहीत. ज्यांनी आनंद दिघेंचा घातपात केलाय त्यांना ठाण्याची जनता माफ करणार नाही. तुम्ही कितीही भाषणे करा, कितीही बोंबला तरी दिघेंचा बदला घेण्यासाठी ठाणेकर सिद्ध असतात. सर्वसामान्य माणसाला दिघेंनी उभारी दिली. त्यामुळे आनंद दिघेंची प्रतिमा पुसण्याचं काही लोक काम करतायेत त्यांना ठाणेकर धडा शिकवतील अशा शब्दात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.
संजय शिरसाट म्हणाले की, आनंद दिघेंचा निश्चित घातपात झालाय. जो माणूस डिस्चार्ज होण्याच्या काही तासापूर्वी मृत्यू होतो. त्याचवेळी त्यांच्यावर जो काही घाला आहे. अनेकांनी ते पाहिलंय.त्यावेळी दबावामुळे कुणी बोलू शकले नाही. सत्तेसाठी माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये यासाठी केलेला तो घातपातच आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.
तसेच आपण ज्यांच्या जीवावर मोठे होतोय त्यांना उद्धव ठाकरे विसरले आहेत. मराठी माणूस आता आपल्यापासून दूर जातोय हे लक्षात आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना उत्तर भारतीयांना आठवण झाली. परंतु त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. २०२४ ला शिवसेना-भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी येणार आहे. एकनाथ शिंदेंकडे येणारे शिवसैनिकच आहेत. ज्यांनी आम्हाला टोमणे मारायचा प्रयत्न केलाय त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला जमणारे शिवसैनिकच आहेत का हे पाहावे असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
दरम्यान, पक्षात राहून किंमत नसेल. बाहेरच्यांना आणून डोक्यावर बसवत असतील तर सामान्य शिवसैनिक सहन करणार नाही. ज्यांनी आयुष्यभर शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अनेक मोठे नाराज आहेत. येणाऱ्या काळात मोठे नेते आमच्याकडे आल्याचे पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करायला तोडपाणी घेतली जाते. समृद्धी महामार्ग, नाणार सर्वच प्रकल्पाला विरोध केला. प्रकल्पाला विरोध करून ब्लॅकमेल करण्याचा उद्धव ठाकरेंचा धंदा आहे असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला.