Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे, तर दुसरीकडे महायुतीचे नेतेही या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अप) प्रमुख अजित पवार यांच्यानंतर, भाजपच्या नेत्या आ. पंकजा मुंडे, आता काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या खा. अशोक चव्हाण यांनी या घोषणेचा विरोध केला आहे.
'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून, महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही. या घोषणेचा इथे फारसा संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण, ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि लोकांना ती आवडेल, असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
पंकजा मुंडेचाही विरोधयापूर्वी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही या घोषणेची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटले होते. आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की, विकास हाच खरा मुद्दा असायला हवा. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
याशिवाय, अजित पवार यांनीदेखील अशा घोषणा महाराष्ट्रात चालणार नाहीत, असे म्हटले होते. या यूपीत चालतात, महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. महाराष्ट्र हा ऋषी, संत, शिवप्रेमी आणि आंबेडकरांचा आहे. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आमच्या रक्तात आहेत आणि आम्ही त्याच मार्गावर जाऊ. मुस्लिमांच्या भावना दुखावू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.