इस्लामपूर : एकाग्रता, संतुलन आणि आत्मविश्वासाचा आविष्कार दाखवत पश्चिम घाटातील चार राज्यांच्या लोककलाकारांनी लोककला आणि संस्कृतीचे सादरीकरण करताना कधी उपस्थितांच्या अंगावर रोमांच, तर कधी शहारे आणले. महाराष्ट्राची लावणी, गोव्याचे समई नृत्य, तर राजस्थानचे तेराताल व गुजरातच्या भवाई नृत्याने पश्चिम भारतातील लोकजीवनाची ओळख करून दिली.केंद्र शासनाच्या पश्मिच क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने व इस्लामपूर नगरपालिकेच्या पुढाकाराने येथील राजारामबापू नाट्यगृहात ‘यात्रा पश्चिमालाप’ हा सांस्कृतिक कार्यक़्रम झाला. रसिकांनी खचाखच भरलेल्या नाट्यगृहात चार राज्यातील लोक-कलाकारांना जल्लोषात दाद दिली. माजी मंत्री आमदार जयंत पाटील, सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक अधिकारी पंकज नागर, अमिता तळेकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, खंडेराव जाधव, तहसीलदार रूपाली सरनोबत, अरुणादेवी पाटील, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.लोकसंस्कृती ही देशाचे मोठे संचित आहे. वारसा हक्काने कला जोपासणारे कलाकार या रंगमंचावर प्रथमच आले. चार राज्यातून सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्याचा पहिला बहुमान इस्लामपूर नगरपालिकेला मिळाला. उंटाच्या शृंगाराची महती (गोरबंध) आणि राजस्थानी लोककलाकारांनी निर्मिलेले परंतु बॉलीवूडने पळवलेले निंबुडा-निंबुडा या गीताच्या सादरीकरणाने राजस्थानी कलाकारांनी या नृत्य व स्वर झंकाराच्या तारा छेडल्या.गोव्याच्या युवतींनी सादर केलेले ‘समई नृत्य’ रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेले. डोक्यावर पेटत्या समई घेऊन विविध मनोऱ्यांची त्यांनी केलेली रचना रसिकांची दाद मिळवून गेली. महाराष्ट्राच्या ‘भारुड’ आणि ‘लावणी’लाही रसिकांनी टाळ्या, शिट्ट्यांची बरसात करीत दाद दिली. गण, मुजरा आणि लावण्यांच्या सादरीकरणाला ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली.गुजरातच्या कलाकारांनी ‘रास दांडिया’ व भवाई नृत्याने उपस्थितांना थक्क केले. दांडियातील ताल आणि ठेक्याने रसिकांनी नवरात्रीचा आनंद लुटला, तर भवाई नृत्याने रोमांच उभे केले. आठ माठांचा थर डोक्यावर घेऊन परातीच्या किनारीवर, ग्लासवर आणि काचांच्या तुकड्यांवर केलेले नृत्य अंगावर शहारे आणणारे ठरले.राजस्थानच्या कलाकारांनी शरीरावर १३ वाद्ये लावून त्यातील नादमधूर सुरांची अविट मैफल सादर केली. दैनंदिन जीवनाची माहिती देणारा हा ‘तेराताल’ नृत्यप्रकार बैठ्या आविष्काराचा बादशहा ठरला. मोरचंगद्वारे तोंडातून वेगवेगळे आवाज काढले, तर कालबेलिया नृत्यप्रकारात वक्रासन करून दोन्ही डोळ्यांनी अंगठ्या व ५०० रुपयांची नोट उचलली. त्यावेळी सारे सभागृह थक्क झाले. (वार्ताहर)चार राज्यातील कलाकारांची हजेरीलोकसंस्कृती ही देशाचे मोठे संचित आहे. वारसा हक्काने कला जोपासणारे कलाकार या रंगमंचावर प्रथमच आले. चार राज्यातून सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्याचा पहिला बहुमान इस्लामपूर नगरपालिकेला मिळाला.दैनंदिन जीवनाची माहिती देणारा हा ‘तेराताल’ नृत्यप्रकार बैठ्या आविष्काराचा बादशहा ठरला. मोरचंगद्वारे तोंडातून वेगवेगळे आवाज काढले, तर कालबेलिया नृत्यप्रकारात वक्रासन करून दोन्ही डोळ्यांनी अंगठ्या व ५०० रुपयांची नोट उचलली.
‘यात्रा पश्चिमालाप’मधून उमजली लोकसंस्कृती
By admin | Published: February 25, 2015 11:31 PM