औरंगाबाद : रुग्णांवर योग्य, सुरक्षित, अचूक आणि आर्थिक दृष्टीने परवडणारे उपचार असावेत. त्यांना गरज नसणाऱ्या तपासण्या आणि अतिरिक्त औषधोपचार करायला लावू नका, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांनी शनिवारी औरंगाबादेत दिला. एमजीएम इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते़ यावेळी एमजीएमचे चेअरमन कमलकिशोर कदम, कुलपती डॉ. के. जी. नारायणखेडकर, कुलगुरू डॉ. एस. एन. कदम आदी उपस्थिती होते. पवार म्हणाले की, रुग्णांचा विश्वास ढळेल असे काहीही करू नका. त्यांची तुमच्याकडून मोठी अपेक्षा असते. दुर्दैवाने आज अनेक वैद्यकीय व्यावसायिक अनैतिक मार्ग अवलंबतात. त्यांच्याकडे रुग्णांच्या तक्रारी व तब्येतीचा इतिहास ऐकण्यास व योग्य तपासण्या करण्यास वेळ नसतो. ते रुग्णांंना महागड्या तपासण्या करण्यास, नको ती औषधे घेण्यास भाग पाडतात. समाजात प्रतिष्ठा आणि नाव कमवायचे असेल तर अशा गैरप्रकारांपासून दूर राहा. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेतील दोन वर्षे काम करण्याचे बंधन स्वत:वर घाला, असा सल्लाही त्यांनी दिला. या कार्यक्रमात शरद पवार यांना एमजीएम इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ सायन्सेसचे कुलपती डॉ. के. जी. नारायणखेडकर यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन यांच्या उपस्थितीत ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांंच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
सामान्यांना परवडणारे उपचार असावेत!
By admin | Published: June 28, 2015 2:01 AM