ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे. चीन वगळता जगातील सर्व देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी आपल्याला मिसाईल किंवा इतर शस्त्रांची आवश्यकता नाही. स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करुन जनतेनेच चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका देणारा सर्जिकल स्ट्राईक करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची सदस्य व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संरक्षक इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. मैत्री परिवार संस्थेतर्फे रविवारी हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाच्या वर्तमान बौद्धिक व युद्धजन्य स्थितीसमोरील आव्हाने व समाधान या विषयावर ते बोलत होते. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानला समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुरापती वाढल्या होत्या. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. मात्र चीनने पाकिस्तानचे समर्थन केले आहे. त्यामुळे चीनलादेखील धक्का देण्याची आवश्यकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. हे प्रमाण व्यापक स्वरुपात व्हायला हवे. प्रत्येक धर्म, पंथाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे इंद्रेशकुमार म्हणाले.देशातील भ्रष्टाचार व काळा पैसा यांच्यावर आळा आणण्यासाठी केंद्र शासनाने ह्यनोटह्णबंदी केली आहे. यानंतर अनेक जणांकडून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र हा निर्णय देशहितासाठी होता व अशा अफवा किंवा उद्भविलेल्या परिस्थितीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. उलट जनतेने थोडा संयम दाखवून भ्रष्टाचाऱ्यांवर अंकुश आणण्याच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असे इंद्रेशकुमार म्हणाले.
जनतेने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा
By admin | Published: November 13, 2016 9:59 PM