Sanjay Raut vs Eknath Shinde Real Shivsena: ईडीच्या भीतीने किंवा अन्य काही आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील तर ते योग्य नाही. जे स्वत:ला बछडे, वाघ म्हणून घेत होते, ते म्हणजे पक्ष नाही. काल जो रस्त्यावर पाहिला तो खरा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अद्यापही मजबूत आहे. काही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया दिली. "गेलेले आमदार का गेलेत त्याची कारणं लवकरच समोर येतील. काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे. शिवसेनेचे १७-१८ भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीशिवाय अशाप्रकारे भाजपाशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही", असा आरोपही संजय राऊत Sanjay Raut यांनी केला.
"आमचा शिवसेना पक्ष ही आमची संपत्ती आहे. उद्धव ठाकरे वर्षा वरून मातोश्री वर जाताना रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना. आमच्या संपर्कात शिवसेनेचे २० आमदार आहेत. त्यांना परत यायचंय असं ते म्हणत आहेत. ज्या प्रकारचे संकट आता आमच्यावर आले आहे त्या संकटाचा सामना करण्याचा पूर्ण अनुभव शिवसेनेला आहे. बाळासाहेबांसोबत आम्ही काम केले आहे. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत असं म्हणून ते भक्त होत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक पळून जात नाहीत", असा खोचक टोला त्यांना लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (२२ जून) एकनाथ शिंदे यांच्या गटात गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे सामील झाले. मंत्री गुलाबराव पाटलांनंतर शिवसेनेला आज सकाळी आणखी एक धक्का बसला. कोकणातील सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे.