मुंबई – देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यातच दिल्लीत कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेतली आहे. परराज्यातून मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी सरकारनं कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. यात दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या राज्यातून रस्ते महामार्गाने मुंबई आणि राज्यात येणाऱ्या लोकांना ९६ तास आधी कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक आहे. या चाचणीत आरटी-पीसीआर नेगिटिव्ह रिपोर्ट आल्यास राज्यात प्रवेश मिळणार आहे. त्याचसोबत इतर राज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांनाही चाचणीशिवाय विमानात प्रवेश मिळणार नाही. राज्य सरकारने विमानाने येणाऱ्या लोकांसाठी कडक निर्बंध आखले आहेत.
जर कोणी प्रवाशी विमानाने मुंबईत येत असेल तर ७२ तासापूर्वी त्या व्यक्तीचा आरटी पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीच्या रिपोर्टशिवाय येण्या-जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.तर दुसरीकडे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसेल तर त्यांची थर्मक स्क्रिनिंग आणि तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे.
सरकारच्या आदेशानुसार जर कोणाकडे प्रवासापूर्वी चाचणी अहवाल नसेल तर त्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणीनंतर जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील. अलीकडेच महाराष्ट्राचे मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सरकार कडक पाऊलं उचलू शकते असे संकेत दिले आहेत.
दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्यांवर नजर
सोमवारी विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. यानंतर दोन्ही ठिकाणाहून दळणवळण व्यवस्था सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. ३० नोव्हेंबरपूर्वी यावर निर्णय घेण्यात येईल. सध्या राज्यात लॉकडाऊनची नियमावली लागू आहे. जर गुजरातने लॉकडाऊन जाहीर केले तर तेथील नागरिक राज्यात येऊ शकतात, ना गुजरातमध्ये जाऊ शकतात. सध्यातरी केंद्र सरकारसोबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे, यात गुजरातसह ३ राज्यांचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टाने माहिती मागवली
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात ४ राज्यांकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. ज्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात यांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबर महिना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा आव्हानात्मक असणार आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयारी करून ठेवली आहे. दिल्लीत रविवारी ६ हजार ७४६ रुग्ण आढळून आले आहेत, तर महाराष्ट्रात ५ हजार ७५३ रुग्ण सापडले आहेत.