गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 03:24 PM2018-02-12T15:24:21+5:302018-02-12T15:25:31+5:30
हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
नांदेड: भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात, पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात, असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा सैन्यदलाचा अपमान आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ सैन्यदलाची व देशाची माफी मागावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.
यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, ज्यावेळी भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावून जम्मू काश्मीरमधील सुंजवां येथे दहशतवाद्यांशी लढत होते. तेव्हाच मोहन भागवत यांनी लष्कराच्या अगोदर संघ स्वयंसेवक तयार होतील, असे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य लष्कराचे मानसिक खच्चीकरण व अवमान करणारे आहे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधीत लढण्याच्यावेळी माफीनामे लिहून देणारे ब्रिटिशांशी हातमिळवणी करून स्वातंत्र्यसैनिकांना पकडून देण्यासाठी मदत करणारे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आज देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वत:च्या बेगड्या देशभक्तीची ग्वाही देत आहेत. हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
मोहन भागवत यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आमची सैन्य तयार करण्याची क्षमता आहे. पण ही आमची लष्करी संघटना नाही. तर ही कौटुंबीक संघटना आहे. पण संघात लष्करासारखीच शिस्त आहे. देशाला गरज असेल आणि संविधानाने परवानगी दिली तर आम्ही सीमेवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसतहसत बलिदान द्यायला तयार आहेत, असे भागवत यांनी सांगितले.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. भागवत यांचे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला. भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. याबद्दल संघाने भारतीय लष्कराची माफी मागितली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.