पुणे : आजकाल जपून बोलावे लागते. प्रत्येक पूर्णविराम, स्वल्पविरामाचा वेगळा अर्थ काढला जातो. राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जात आहे. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे , अशा खरमरीत शब्दात प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय यांनी सद्य परिस्थितीवर बोट ठेवले.
पुण्यात एल्गार परिषदेचे शनिवारी( दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय म्हणाल्या, कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वाना लवकरात लवकर मुक्त केले जावे हीच माझी भावना. मोठी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ती वाचण्यातच संपूर्ण आयुष्य निघून जाईल.
शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा...
शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके मागे घेतली जावी. दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. तसेच पश्चिम बंगाल निवडणुकाजवळ येत आहेत. त्या अनुषंगाने बातम्या पेरल्या जात आहेत. बदनाम केले जाणे, दबाव निर्माण करणे अशा परिस्थितीत परिषद आयोजित करणे ही धाडसाची बाब आहे.
भारतात आपल्याला हजारो वर्षे मागे नेले जात आहे. एल्गार परिषद संविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. कोरेगाव भीमाची लढाई २०० वर्षांपूर्वीची मात्र, वसाहतीकरणाचे अंश मागे सोडून गेले. पेशवाई गेली, ब्राम्हणवाद गेला नाही. ब्राम्हणवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. मोदींच्या रुपात दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. असेही रॉय यावेळी म्हणाल्या.
भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस.... भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत. या वर्गाची कोणती जात आहे? कॉर्पोरेट कंपन्यांवर घराणेशाहीचा हक्क आहे.