मनोज मुळ्ये केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक मतदान करतात. किती उद्योग आले ? किती लोकांना रोजगार मिळाला ? पाण्याची समस्या सुटली का ? प्रशासकीय कामे वेळेत होतात की नाही ? पर्यटन विकासासाठी काय केले ? शेती, बागायतीसाठी काय केले ? आरोग्याच्या सुविधा वाढल्या का ? सांस्कृतिक चळवळ वाढण्यासाठी काय केले ? उमेदवाराचे शिक्षण किती आहे ? त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे का ? अशा प्रश्नांची मोजपट्टी लावून लोक उमेदवाराला मतदान करत असतील का ? या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही, असेच येईल. जर काम बघून उमेदवार निवडला जात असेल तर वर्षानुवर्षे काम करणारा राजकीय नेता पडतो आणि राजकारण, समाजकारणात नवखा असलेला अभिनेता निवडून येतो, अशी उदाहरणे दिसली नसती. शिक्षण आणि राजकारणाची सांगड लोक कधीच घालत नाहीत. ज्याला तळमळीने काम करायचे आहे, त्याला शिक्षण आडवे येत नाही, याची असंख्य उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. उद्योग, रोजगार, पर्यटन यासारख्या सार्वजनिक विषयांवरुन लोक वैयक्तिक मत बनवत नाहीत. मग लोक नक्की काय बघून मतदान करत असावेत ?राजकीय लोकांच्यादृष्टीने कदाचित याचे पाचदहा निकष असतील; पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तळागाळातील सक्षम कार्यकर्ता. सामान्य माणसांचा राजकीय नेत्यांशी थेट संपर्क खूप कमी वेळा येतो. त्यांचा अधिक संपर्क असतो तो त्यांच्या गावातल्या कार्यकर्त्याशी. त्यांच्या वाडीतील सार्वजनिक समस्या असोत किंवा त्याला वैयक्तिक स्तरावर लागणारी रुग्णालय, सरकारी कार्यालयाबाबतची मदत असो, त्याच्या उपयोगी पडतो तो त्याच्या गावातला कार्यकर्ता.सरकारी कार्यालयात कामात दिरंगाई होत असेल तर ते लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांच्यासोबत कार्यकर्ताच पुढे असतो. नेत्याकडे जाऊन आपल्या गावासाठी पाणी योजना आणणारा कार्यकर्ताच असतो. तोच त्या गावासाठी नेता असतो. त्याच्यावरच लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते आहेत, त्याच पक्षाला लोक निवडून देतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ज्यांना मोठे यश मिळते, तोच त्या भागातील प्रमुख पक्ष.
ही ताकद अनेक वर्षे शिवसेनेकडे (एकत्रित शिवसेनेकडे) आहे. काँग्रेसकडे, भाजपकडे असे तळागाळातले मान मोडून लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते कमी आहेत. शिवसेना खालोखाल ही ताकद राष्ट्रवादीकडे आहे; पण या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. कार्यकर्ते इकडून तिकडे गेले आहेत. कोणाचा पाया किती मजबूत आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच स्पष्ट होणार आहे.