नागपूर: 'शरद पवारांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन', असे जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल', असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
सुधीर मुनगंटीवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप आपल्या शिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेनं कपोकल्पित गोष्टी समोर आणल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काँग्रेसबद्दल टोकाची भूमिका होती. तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. त्यांना राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही. जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल, असं मुनगंटीवार म्हणाले.
मंदिर बंद आणि दारुची दुकाने सुरूयावेळी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणतात कोरोना विरोधात आंदोलन करू. आम्ही पण साथ देऊ. पण ज्या प्रमाणे मंदिर बंद आहे, त्याप्रमाणे दारुची दुकान बंद करा. तुम्हाला दारूच्या दुकानावर एवढं का प्रेम आहे? त्या ठिकाणी गर्दी होत नाही का? मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन बघावं बारमध्ये किती गर्दी आहे, असंही ते म्हणाले.