औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी केलेल्या आरोपानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तरसभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर आता राज ठाकरेंनी येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितले. तेव्हापासून या सभेला विरोध करण्यासाठी शिवसेनेसह अनेक संघटना सरसावल्या आहेत.
त्यात शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनसेवर बोचरी टीका करत राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोकांना आणवं लागेल असं म्हटलं आहे. खैरे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला स्वत:हून लोकं येतात. मनसेच्या सभेला लोकं आणण्यासाठी पैसे दिले जातात. सभेला येणाऱ्या लोकांना विचारावं. मागच्या मेळाव्यात ३०० रुपये देऊन लोकं आणली असा दावा त्यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे वैफल्यग्रस्त नेते – मनसे
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, असा टोला मारणाऱ्या चंद्रकांत खैरेंना मनसेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे वैफल्य ग्रस्त नेते असून त्यांना त्यांच्याच पक्षात आता जागा नाहीये. त्यांचं हे वक्तव्य वैफल्यातून आलं आहे. या राज्यात राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी स्वयंस्फूर्ततेने येते असं टोला मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी चंद्रकांत खैरेंना लगावला आहे.
राज ठाकरेंच्या सभेला विरोध
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवावे यासाठी ३ मेपर्यंत मुदत दिली आहे. मशिदीवरील भोंगे ही धार्मिक समस्या नसून सामाजिक समस्या आहे. त्याचा हिंदुंसोबत इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे हे भोंगे उतरवलेच पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केले. राज ठाकरेंच्या या विधानामुळे मुस्लीम समाजात त्यांच्याबद्दल तीव्र आक्षेप घेण्यात आला. राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करणारी विधानं करत असल्याने औरंगाबाद येथील सभेला परवानगी देऊ नये यासाठी विविध संघटनांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली आहे. काहीजण कोर्टातही जाण्याच्या तयारीत आहे.