सोलापूर - Praniti Shinde on Covid Vaccine ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्यात. त्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत कोविड काळात लोकांना जबरदस्तीनं लस घ्यायला लावली. त्या लसीमुळे अनेकांना शुगर, बीपी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला असा दावा त्यांनी केला. प्रणिती शिंदे यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचं कंत्राट मिळालं. त्यातून सीरमने भारतीय जनता पार्टीला १०० कोटी रुपये दिले. कोविड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास झाला त्यामुळे मी लस घेतलीच नाही असंही त्यांनी जाहीर सांगितले. त्याचसोबत सरकारने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे आज कुणाला काही ना काही दुखणे सुरू झाले. ज्यांना काहीच नव्हतं अशांनाही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झालेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत मी व्हॅक्सिन घेतले नाही. कशासाठी घ्यायचे, आपला एकमेव देश आहे ज्याच्या व्हॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो होता. कोरोनात किमान ५० लाख लोकांचा मृत्यू झाला. एकीकडे मृतदेहांचा खच पडत होता तर दुसरीकडे सरकार लस बनवणाऱ्या कंपनीला पैसे देत होती. नरेंद्र मोदी तुम्हाला थाळ्या वाजवायला सांगितल्या. पण तुम्ही थाळी वाजवताना सीरमकडून ते कोट्यवधी रुपये पक्षासाठी काढत होते. कोरोनात भाजपाने पैसे चोरले अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
दरम्यान, प्रणिती शिंदे या सोलापूरातील विविध गावांच्या भेटीवर आहेत. त्याठिकाणी लोकांशी संवाद साधताना प्रणिती शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधला. यावेळी प्रणिती यांनी सीरम इन्स्टिट्यूटने भाजपाला इलेक्टरोल बॉन्डच्या माध्यमातून दिलेल्या पैशावरून लक्ष्य केले. सर्वोच्च न्यायालयात इलेक्टरोल बॉन्डवरून स्टेट बँक ऑफ इंडियावर ताशेरे ओढण्यात आले. ज्या कंपनीला सरकारने लस बनवण्याचं कंत्राट दिले त्या कंपनीने भाजपाला कोट्यवधीची देणगी दिल्याचं यातून समोर आले.