अहमदनगर - केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील जनआक्रोशाचे वादळ देशाची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारची सत्ता उलथवून लावेल, असे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अहमदनगर येथे आयोजित उत्तर महाराष्ट्राच्या जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक भूमिकेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, याच भूमीत ब्रिटीश राजवट उलथवून टाकण्याचे निर्णय झाले. त्याच भूमीत आज शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाचे वादळ निर्माण झाले असून, जनतेला वेठीस धरणारे भाजप-शिवसेनेचे सरकार पायउतार केल्याशिवाय हे वादळ शांत होणार नाही.
केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले असून, त्याअंतर्गत राज्यातील ६ विभागात मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. आज अहमदनगर येथे उत्तर महाराष्ट्र विभागाच्या जनआक्रोश मेळाव्याच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रारंभ झाला.
या मेळाव्याला केंद्रीय नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश,महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, गटनेते आ.शरद रणपीसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांनी त्यांना अभिवादन केले.
केंद्रात आणि राज्यात सध्या शेतकरी विरोधी सरकार असून, त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका करताना ते म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी इंग्रजांची दलाली केली, ते सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवू पाहत आहेत. भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतमालाला हमीभाव नाही. नोटाबंदीसारखा तुघलकी निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरूण जेटली यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर नाचत असून, मोदी आणि जेटलींनी देश विकण्याचे काम सुरु केले आहे, असा घणाघाती आरोप मोहन प्रकाश यांनी केला. ६० वर्षात काँग्रेसने काय केले, असे विचारणाऱ्या मोदी सरकारच्या काळात बँकांचा एनपीए ५ लाख ७६ हजार कोटींनी वाढला आहे. काळा पैसा आणू म्हणणाऱ्या आणि १५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करणा-यांनी किमान १५ हजार रुपयांची तरी मनीऑर्डर करायला हवी होती, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.