मुंबई - राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही. केवळ आमचा नेता बदलला आहे. आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार घेऊन पुढे जातोय असं एकनाथ शिंदेंकडून वारंवार सांगितले जात आहे.
आमदार, खासदार यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही पक्षबांधणी सुरू केली आहे. शिंदे गटात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असावं म्हणून दादर, ठाण्यात मध्यवर्ती कार्यालय उभारलं जाणार आहे. एकप्रकारे हे कार्यालय प्रति शिवसेनाभवन असेल असं सांगण्यात येत आहे. या कार्यालयात पक्षाचे शिवसैनिक, शाखाप्रमुख, आमदार, खासदार, नगरसेवक येऊ शकतील. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील. त्याठिकाणाहून राज्यभरात पक्षाची ध्येय धोरणं, कार्यक्रम दिले जातील. पक्षाचे पुढचे निर्णय त्या कार्यालयातून होतील अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
खरी शिवसेना कुणाची?शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार गेले आहेत. त्याचसोबत नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटाला पाठिंबा देत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी बनवण्यात आली आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे बहुमत आहे असा दावा करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्हाला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. मात्र स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे यांनी दादर भागात प्रति शिवसेना भवन उभारत थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले आहे.
३५ वर्षाचे संबंध सहज तुटणार नाहीतमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बऱ्याच दिवसाने मतदारसंघात जात आहे. लोकांचे आशीर्वाद घेणार आहे. नवीन इनिंग आजपासून सुरू होतेय. कार्यकर्त्यांनी रॅलीच्या माध्यमातून स्वागत करण्याचं ठरवलं आहे. लोकांचे प्रेम आहे. मागच्यावेळी रेल्वे स्टेशनवर १५ हजार लोक जमले होते. आम्ही ग्राऊंड पातळीवरील कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक संबंध आहे. हे आजचे नाही ३५ वर्षाचे संबंध आहेत ते सहज तुटणार नाही. उद्धव ठाकरेंबाबत कुणीही काहीही बोलले नाही. संजय शिरसाट नाराज आहेत असं नाही असंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.