मुंबई : मुंबईत लोकसभा निवडणुकीत झालेल्या रेकॉर्डब्रेक मतदानानंतर सर्वांचेच लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले होते. २००९ साली झालेल्या निवडणुकीत ४० टक्क्यांचा पल्लाही न गाठणाऱ्या मुंबईने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५३.७५ टक्के मतदानाची नोंद केली होती. त्या रेकॉर्डला मागे टाकत बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५४.११ टक्के रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाली आहे.सकाळपासून शहरातील मतदारांत म्हणावा तितका उत्साह दिसला नाही. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंतच्या सहा तासांत शहरात सरासरी २८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर दुपारी भरउन्हात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुपारच्या उन्हात शहरातील मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील १० मतदारसंघांत एकूण ७ लाख ७ हजार ३०५ मतदारांनी मतदान केले होते. त्यात ४ लाख २४ हजार ३६४ पुरुष, तर २ लाख ८२ हजार ९२७ महिला मतदारांचा समावेश होता. महिला मतदारांच्या घटत्या आकडेवारीमुळे यंदा मुंबईत ५० टक्केही मतदान होणार नाही, अशी धडकी राजकीय पक्षांच्या मनात होती. मात्र दुपारी एक वाजल्यानंतरच्या दोन तासांत महिला मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील मतदानाचा आकडा ३८.६२ टक्क्यांवर पोहोचला. दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान, सुमारे १ लाख २० हजार महिला आणि तितक्याच पुरुषांनी मतदान केले.
मुंबईत टक्का वाढला!
By admin | Published: October 16, 2014 5:20 AM