लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पुण्यातील बुथवर वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) फॉरेन्सिक चाचणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातील पर्वती मतदारसंघातील बुथ क्रमांक १८५ मधील ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी याचिकेद्वारे केला आहे. ईव्हीएममध्ये करण्यात आलेल्या घोळामुळेच निवडणूक हरल्याचा दावा छाजेड यांनी केला आहे. त्यांच्या या याचिकेवर न्या. मृदुला भाटकर यांनी बुथ क्रमांक १८५ मधील ईव्हीएम हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी पाठवण्याचा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला. बुथ क्रमांक १८५ आणि २४२ मधून ८९ मतदारांनी आपल्यालाच मत दिल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. मात्र तरीही केवळ ६९ मतेच मिळाली आहेत, असे छाजेड यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने या मशीन्सची चाचणी करण्यासाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचा आदेश दिला. मतदानाच्या दिवशी व निकालाच्या दिवशी कोणी ईव्हीएममधील माहिती मिळवली होती का, याचीही माहिती देण्याचे निर्देश लॅबला देत या याचिकेवरील पुढील सुनावणी २० जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करा
By admin | Published: May 09, 2017 2:36 AM