वाशिम, दि. 6 - जन्मत: नेत्रहीन असल्याने संपूर्ण आयुष्य अंधकारमय असतानाही अप्रतिम राख्या बनवून डोळसांना लाजविणारी कामगिरी वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर या ग्रुपच्या अंध मुलांनी केली आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर त्यांनी केलेला हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.जन्मत: डोळे नसल्यामुळे संपूर्ण आयुष्यात अंधकार पसरलेला असताना चेतन उचितकर याने चेतन सेवांकूरमधील आपल्या अंध मित्रांच्या सहाय्याने मनात कुठलीही निराशा अथवा खंत न बाळगता ईश्वराने दिलेल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर संगीत कला हस्तगत केली आहे. केवळ वाशिम जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, इत्यादी राज्यांतही आपल्या याच कलेद्वारे शेतकरी आत्महत्यांसह व्यसनमुक्तीबाबत प्रबोधनपर कार्यक्रम राबवून समाजाला प्रोत्साहित करण्याचे कार्य केले आहे. लग्न समारंभातील कार्यक्रमासह पथनाट्य, व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली उपजीविका करणा-या चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनच्या दृष्टिहीन अंध सदस्यांनी रक्षाबंधनाच्या पृष्ठभूमीवर उपजीविकेचा पर्याय म्हणून राख्या निर्माण करण्याचे काम सुरू केले. त्यानुसार हजारो राख्या तयार केल्या आणि अकोला येथील जागृती विद्यालय अकोला, भारत विद्यालय अकोला व जिजाऊ वाडा आदी ठिकाणी एका दिवसात तब्बल 15 हजार रुपयांच्या राख्यांची विक्री केली. त्याशिवाय वाशिम जिल्ह्यातही राखी पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या शाळांसह इतर ठिकाणी ते राख्या विकत आहेत. एकीकडे ऐहिक सुखात हिरावून जात गैरमार्गाचा अवलंब करून शिक्षित तसेच उच्चशिक्षित वर्ग आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असताना दुसरीकडे डोळे नसतानाही राख्या निर्मितीचे कठीणतम कार्य करून रोजगार मिळवून उपजीविका चालविणा-या या अंध मुलांनी आपली जिद्द व चिकाटी, परिश्रम व जगण्याची उमेद या माध्यमाने दाखवून दिली आहे.चेतन सोबत लक्ष्मी बळीराम वाघ, प्रविण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुन गोडघासे, तुळशिराम श्रीकांत तिवारी, रुपाली सोपान फुल सावंगी, या अंध मुलांनी सुंदर आकर्षक, व स्वस्त अशा राख्यांची निर्मिती केली आहे.संगीतमय आर्केस्ट्रा चालवून स्वताचा उदरनिर्वाह करणा-या हा चिमुकला चेतन शेतकरी आत्महत्या, नेत्रदान, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती अभियान, अशा विविध कार्यक्रमांद्वारे व्याख्यान देवून सामाजिक उपक्रमावर जनजागरण करून समाज सेवेचे व्रत अंगीकारले आहे. चेतन याचा 30 जुलै रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते विशेष गौरव व सत्कार करण्यात आला असून, खुद्द मुख्यमंत्री पर्रीकर यांनी चेतन याच्या कार्यांबद्दल हा चिमुकला चेतन नव्हे तर छोटा चेतन आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.
रक्षाबंधनाच्या पर्वावर अंध मुलांची डोळस कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 3:33 PM