जीवन रामावत /नागपूरगावागावात ‘पारसबाग’ फुलवून, त्यातून सेंद्रीय पद्धतीने पोषक भाजीपाला पिकवून अॅनिमियावर मात करण्याचा प्रयोग विदर्भात यशस्वी झाला आहे. स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन उभारलेला हा ‘अॅनिमिया’ मुक्तीचा लढा उभारला आहे.भारत जागातील ७६ कुपोषित (उपाशी) देशांच्या सूचीमध्ये ५५ व्या क्रमांकावर आहे. देशात १९६० मध्ये जेव्हा हरित क्रांतीची सुरुवात झाली, तेव्हा केवळ काहीच राज्यात नगदी पिके घेतली जात होती. त्यात कापूस हे मुख्यत: कोरडवाहू जमिनीत घेतल्या जात होते. विदर्भातील ते पारंपरिक पीक होते. मात्र, शेतकरी या पिकासोबतच ज्वारी, भुईमूग, तूर, भाजीपाला व बाजरी यासारखी पारंपरिक पिके घेऊन आपल्या कुटुंबाची पोषक आहाराची गरज पूर्ण करीत होते. मात्र, हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांनी या पोषक अन्नपिकांकडे पाठ फिरवून सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे स्वत: शेतकरी आपल्या कुटुंबाच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी बाजारातून धान्य विकत घेऊ लागला. यामुळे शेतीचा खर्च वाढला, कर्ज वाढले आणि शेतकऱ्यांचा तोटाही वाढला. एवढेच नव्हे, तर शेतकरी कुटुंबाच्या ताटातील पोषक अन्नही गायब झाले. रासायनिक खते व विषारी औषधाचा भडिमार करून पिकविलेले अन्नधान्य बाजारात आले. कुपोषण आणि अॅनिमिया यांसारख्या समस्या तयार झाल्या.या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी सर्वांत सरळ आणि सोपा उपाय म्हणजे, आहारात बदल करणे. भाजीपाल्याने ‘अॅनिमिया’ची कमतरता भरून काढता येते. ही गोष्ट लक्षात घेऊन, विदर्भातील तब्बल २० स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि किशोरवयीन मुलींनी शाळा व ग्रामीण भागात पोषक आणि सेंद्रीय ‘परसबाग’ विकासाचे काम हाती घेतले आहे. त्या परसबागेतून ग्रामीण भागातील लोकांना पोषक आणि सेंद्रीय भाजीपाला उपलब्ध होऊन ‘अॅनिमिया’ची समस्या सोडविण्यास मदत होत आहे.
परसबाग फुलवून ‘अॅनिमिया’मुक्ती!
By admin | Published: April 24, 2017 3:28 AM