मुंबई : रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू आणि स्फोटक पदार्थ ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनांनंतर मध्य रेल्वेवरील परळ स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा फोन शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. यात रविवारी परळ स्थानक बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) चोख बंदोबस्त ठेवून स्थानकाची तपासणी करण्यात आली. तसेच मोठी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु अधिक तपासानंतर ही अफवाच ठरली. रेल्वे स्थानकांमध्ये गेल्या काही दिवसांत घातपात घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र पोलिसांकडून लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफसोबत बैठकही घेतली व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. रेल्वे पोलिसांकडून खबरदारीचे उपाय केले जात असतानाच मध्य रेल्वेवरील परळ स्थानक स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली. हा फोन येताच तत्काळ लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफचे जवान स्थानकात मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले. तसेच डॉग्ज स्क्वॉडसह स्थानकाची तपासणी करण्यात आली. मुंबई नियंत्रण कक्षाला आलेल्या या फोनची चौकशी केली असता तो एका पीसीओवरून करण्यात आला होता आणि धमकी देणाऱ्याने आपले नाव उमाकांत मिश्रा असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर नावात साम्य असणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांचा घटनेशी संबंध नसल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी) >परळ स्थानकाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. परळसह स्थानकांवरीलही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. याबाबत मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे ते म्हणाले
परळ स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी
By admin | Published: April 03, 2017 2:41 AM