यवतमाळ : अवघ्या काही दिवसांत एकाच व्यक्तीचे बदल्यांचे आदेश काढणे म्हणजे हा सरकारचा चावटपणा आहे, असे सांगत मुंबई ‘मॅट’ने अन्न व औषधी प्रशासन विभागातील गंभीर प्रकरणांची चौकशी करणा-या एका महिला सहायक आयुक्तांच्या बदलीला कायम स्थगिती दिली.माधुरी मनोहर पवार असे या अधिका-याचे नाव आहे. त्या सहायक आयुक्त (औषधी) या पदावर कार्यरत आहेत. राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त म्हणून निवड झालेल्या माधुरी पवार यांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या मुंबईतील आयुक्तालयात तीन वर्षे पूर्ण केली. त्यांची ३१ मे २०१७ ला ठाणे येथे बदली करण्यात आली. ६ जून २०१७ ला त्या तेथे रुजू झाल्या. मात्र त्यानंतर विशिष्ट हेतूने दीडच महिन्यात त्यांची १९ जुलै २०१७ ला अचानक बीड येथे बदली करण्यात आली. त्यांच्या ठाणेतील जागेवर लातूर येथील समकक्ष पी.व्ही. पवार यांना आणण्यात आले. माधुरी पवार यांनी दीड महिन्यात झालेल्या आपल्या बदलीला अॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) आव्हान दिले. तत्कालीन उपाध्यक्ष आर.बी. मलिक यांनी ८ आॅगस्ट २०१७ ला त्यांच्या बदलीला अंतरिम स्थगनादेश दिला.माधुरी पवार यांचे प्रकरण आता ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांच्यापुढे आले असता प्रकरणाला कलाटणी मिळेल, अशी काही नवीन कागदपत्रे अथवा मुद्दा तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा सरकारी वकिलांना करण्यात आली. मात्र नवे काहीच नसल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले. त्यावर माधुरी पवार यांच्या बदलीबाबत अन्न व औषधी प्रशासन आयुक्तालयाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळे आदेश काढणे म्हणजे सरकारचा चावटपणा आहे असे निरिक्षण ‘मॅट’ने नोंदविले. माधुरी यांच्या बदलीमागे कोणतेही संयुक्तीक कारण शासन देऊ शकलेले नाही, असे नमुद करीत न्या. जोशी यांनी माधुरी पवार यांच्या बदलीच्या अंतरिम स्थगितीला कायम स्थगितीचा आदेश देऊन १६ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रकरण निकाली काढले. प्रकरणात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून के.बी. भिसे यांनी काम पाहिले. तर लातूर येथील सहायक आयुक्त पी.व्ही. पवार यांच्यावतीने अॅड. एम.आर. पाटील यांनी काम पाहिले.बदली आदेशाची १४ महिन्यानंतर अंमलबजावणी- वास्तविक मे २०१६ मध्ये माधुरी पवार यांची मुंबईहून बीडला रिक्त जागेवर बदली झाली होती. त्या या बदलीसाठी मुंबईत सलग सहा वर्षे झाल्याने पात्रही होत्या. मात्र हा बदली आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तो एफडीए मुख्यालयातच पडून राहिला. शिवाय या आदेशाबाबत एफडीए आयुक्तालयाकडूनही माधुरी पवार यांना कधी विचारणा झाली नाही.- दरम्यान सुलोचने नामक अधिकाºयाची मुंबईहून प्रतिनियुक्तीवर बीडला बदली करण्यात आली होती. काम बीडमध्ये पगार मुंबईतून असा प्रकार नऊ महिने चालला. मात्र मेमध्ये नियमित साताºयाला बदली करून घेत त्यांनी आपली सुटका करून घेतली.- मे २०१६ मध्ये माधुरी पवार यांची मुंबईहून बीडला बदली करण्यात आली होती. या आदेशाची अंमलबजावणी चक्क जुलै २०१७ मध्ये करण्यात आली. त्यावर ‘मॅट’ने आक्षेप नोंदविला.सिनेअभिनेत्रीच्या ड्रग्ज तस्करीची चौकशीसहायक औषधी संचालक माधुरी पवार यांच्या धाडसत्रामुळे अनेक औषध कंपन्या अडचणीत आल्या होत्या. सिनेअभिनेत्री ममता कुळकर्णी यांचे ड्रग्ज तस्करीचे प्रकरणही माधुरी यांच्याकडेच चौकशी व तपासाला होते. यातूनच अनेकांचे हितसंबंध दुखावल्याने अखेर माधुरी पवार यांची राजकीय दबावातून बदली करून घेतली गेल्याचे सांगितले जाते.
औषधी सहायक आयुक्तांच्या बदलीला कायम स्थगिती , ‘मॅट’चा दिलासा, म्हणे, हा तर सरकारचा चावटपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 4:51 AM