ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर गृहखात्याने मुंबईत ७० डान्सबार सुरु करण्यास अंतरिम परवानगी दिली आहे. गृहखात्याकडे डान्सबार सुरु करण्याच्या परवान्यासाठी १०० अर्ज आले होते. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवताना डान्सबारसाठी काही निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने डान्सबारचा परवाना मिळवण्यासाठी २६ अटी घातल्या आहेत.
डान्सबारना तुम्ही सरसकट बंदी करू शकत नाही. मात्र, तेथे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अटी मात्र जरूर घालू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविताना स्पष्ट केले होते. त्यामुळे डान्सबारच्या परवान्यासाठी २६ अटी घातल्या आहेत. या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच अंतिम परवानगी दिली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार १०० पैकी २६ फेटाळण्यात आले तर, चार अर्जांवर अद्यापही निर्णय झालेला नाही.
अर्जदाराने तो या अटींच्या पूर्ततेस सक्षम आहे का, याचा स्वत: आढावा घेऊन, तसे लेखी देणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही निरीक्षकामार्फत लेखा परीक्षण करून संबंधितास परवाना मिळेल.अर्ज नामंजूर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. काही अर्ज अशा व्यक्तींच्या नावे होते, ज्यांच्याकडे यापूर्वी परवाना होता. मात्र, ती व्यक्ती आता हयात नाही. काही प्रकरणांत बार ज्या सोसायटीत आहे, तेथील रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते.
डान्सबार सुरु झाल्यानंतर तिथे अश्लीलता असू नये असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवतानाच स्पष्ट केले होते. त्यामुळे नव्या अटींनुसार डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक आहे आणि सीसीटीव्हीचे थेट कनेक्शन नजीकच्या पोलिस स्थानकाला जोडलेले असले पाहिजे.