पुणे : महापालिकेच्या कोंढवा येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएमचे तेलंगणा विधानसभेतील आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. प्रक्षोभक आणि जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांमुळे त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याने परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कोंढवा येथील प्रभाग क्रमांक ६३ (अ) मधील सेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार ओवेसी यांची २६ आॅक्टोबर रोजी सभा घेण्यासाठी एमआयएमचे प्रचार प्रमुख अजहर तांबोळी यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, या सभेला परवानगी नाकारण्याचा निर्णय शनिवारी कोंढवा पोलिसांनी घेतला. याबाबत तांबोळी यांनी लेखी कळविण्यात आले आहे. ओवेसी यांच्याविरूद्ध प्रक्षोभक आणि जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांमुळे हैद्राबाद, तेलंगणा, मुंबई आणि बिहार याठिकाणी एकूण १० गुन्हे दाखल आहेत. कोंढवा येथे ते याच स्वरूपाचे भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व परिसरात शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याने परवानगी नाकारण्यात येत आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, मागील सभेप्रमाणे याही सभेस परवानगी द्यावी यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून लोकशाही मार्गाने इतर पक्षांप्रमाणेच आमच्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी पोलिसांनी काही अटींवर परवानगी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले.
ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली
By admin | Published: October 25, 2015 3:45 AM