ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - शिवाजी पार्क परिसरातील सेल्फी पॉईंटवरुन रंगलेल्या वादात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे तूर्तास तरी इथे कुठल्याही पक्षाचा सेल्फी पॉईंट उभा राहणार नाही. शिवाजी पार्कमधील नागरिकांनीच तक्रार केल्यामुळे सेल्फी पॉईंटला परवानगी नाकारल्याने महापालिकेकडून सांगण्यात आले.
दादरमधील पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी इथे उभारलेला सेल्फी पॉईंट हटवला. त्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवाजीपार्क मैदानात अधिक आकर्षक पद्धतीने सेल्फी पॉईंट उभारण्याची घोषणा केली. आपण या स्पर्धेत मागे पडू नये म्हणून शिवसेनेनेही इथे सेल्फी उभारण्याची घोषणा केली.
तो पर्यंत मनसेने राज ठाकरेंच्या आदेशाने सेल्फी पॉईंट उभारणार असल्याचे फलक लावले होते. अखेर शुक्रवारी जी नॉर्थच्या सहाय्यक आयुक्तांनी 50 फुटांच्या अंतराने तिन्ही पक्षांना इथे सेल्फी पॉईंटसाठी जागा दिली होती. पण आता शिवाजी पार्कमधल्या नागरीकांनीच या सेल्फीश राजकारणा विरोधात तक्रार केल्याने महापालिका आयुक्तांनी तिन्ही पक्षांना परवानगी नाकारली आहे.