लक्ष्मण मोरे पुणे : काही वर्षांपूर्वी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांनी साकारलेला ‘जोगवा’ सिनेमा आजही अंगावर शहारे आणतो. समाजातील देवभोळेपणावर प्रहार करणाऱ्या या सिनेमाच्या कथानकासारखी घटना कोंढव्यातील एका तरूणाच्या आयुष्यात घडली आहे. चक्क आई आणि भावांनीच १९ वर्षीय तरूणाला साडी नेसून जोगता हो, देव देव करून पैसे कमावून दे, यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली. विरोध करताच आसुडाने मारहाण केली जात असल्याचे या तरूणाने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.हा तरूण कुटुंबियांच्या प्रचंड दहशतीखाली आहे. त्याचे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून घरी आई, चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मोठ्या भावांची लग्ने झालेली असून त्यांना मुले आहेत. पीडित तरुणाच्या अंगात देवीचे वारे येते असे त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे. घरातील वातावरण अंधश्रद्धाळलेले असल्याने सर्वांनी त्याला देवीचा भगत म्हणून साडी नेसण्याचा आग्रह धरला आहे. मागील दोन वर्षांपासून त्याला सतत मारहाण केली जात आहे.हा तरूण कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये साफसफाईची आणि कचरा काढण्याची कामे करतो. दरमहा पगार हातात पडताच त्याला पुन्हा मारहाण सुरू केली जाते. आपण साडी नेसणार नाही आणि जोगता होणार नाही यावर तो ठाम आहे. मात्र, आई आणि दोन मोठे भाऊ त्याला यासाठी बळजबरी करतात. साडी नेस, घरात देव्हारा बनव, जोगता हो आणि लोकांचे बरे वाईट बघून पैसे कमावून दे, असा तगादा लावला आहे.सततची मारहाण आणि त्रास याला कंटाळून त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने घरच्यांकडून होणाºया त्रासाबाबत तो काम करीत असलेल्या सोसायटीतीतील नुरजहॉं शेख यांना सांगितले. शेख या दलित मुस्लिम ओबीसी विकास संघाच्या महासचिव आहेत. त्यांनी तरूणाला घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
साडी नेसावी म्हणून छळ; तरूणाने घेतली पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 3:30 AM