सोलापूर - बस्स, एकदाचं पांडुरंगाच्या दरबारात डोळे मिटावं म्हणजे या जन्माचं सार्थक होईल, असे कित्येक वारकरी आषाढी वा कार्तिकी वारीत चालताना बोलून जातात. तर, जन्म अन् मृत्यू त्याच्या हातात आहे. त्यानं बोलावलं की जायचं, असे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र, देऊळगाव राजा तालुक्यातील एका वारकऱ्याला ऐन कार्तिकी एकादशीदिवशीच पांडुरंगाच्या दारी मरण आले. कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर सोमवारी वारकरी गणेशराव डोके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे वारकरी संप्रदाय अन् गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
अरे, झालं ते वाईट, पण एकादशीच चांगल मरण आलं, असे शब्द आपण नेहमीच गावखेड्यात लोकांच्या तोंडून ऐकतो. एखाद्याचे अकस्मात निधन झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. मात्र, त्यानंतर चर्चा होते ती निधनाची, त्या दिवसाची अन् मृत्युच्या कारणाची. देऊळगाव राजा येथील वारकरी गणेशराव डोके यांच्या मृत्युनंतरही अशीच चर्चा रंगली. कारण, गेल्या 35 वर्षांपासून न चुकता पंढरीची वारी करणाऱ्या गणेश डोके यांना विठ्ठलचरणीच मरण आले. योगायोग म्हणजे सन 2011 साली मानाचे वारकरी म्हणून पंढरपूर संस्थानाकडून गणेशराव डोकेंचा सपत्नीक सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गणेशराव आणि त्यांच्या पत्नी रुख्मीनीबाई यांना मानाचे वारकरी म्हणून गौरवले होते. डोके यांच्यारुपाने तालुक्याला प्रथमच हा मान मिळाला होता. त्यामुळे गावकऱ्यांनीही त्यांचा सत्कार केला होता. मात्र, आता 2018 साली कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात दाखल झाल्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वारकरी संप्रदाय आणि गावावर शोककळा पसरली आहे. पण, निस्सीम पांडुरंग भक्ताच्या मृत्युचा हा दैवी योगायोग सर्वच ठिकाणी चर्चेचा विषय बनला.