ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 05 - शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या नात्यातील नवा ट्विस्ट समोर आला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त करणा-या पीटर मुखर्जीला इंद्राणीकडून घटस्फोट हवा असल्याची माहिती मिळाली आहे. जानेवारी महिन्यापासून पीटर मुखर्जी घटस्फोटासाठी प्रयत्न करत आहे.
'यावर्षीच्या सुरुवातीपासूनच पीटर मुखर्जी यांनी हे नातं आता संपलं असून मला घटस्फोट हवा असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरु असल्याने घटस्फोटाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे', अशी माहिती पीटर मुखर्जीचे वकील मिहीर यांनी दिली आहे.
'इंद्राणी मुखर्जीने पीटर मुखर्जीला डिसेंबर महिन्यापासून पत्र पाठवण्यास सुरुवात केली. इंद्राणीने आतापर्यत 40 पत्रं पीटर मुखर्जीला पाठवली आहेत. पीटर मुखर्जीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार लिहिलेलं पत्र हे त्यांच्याकडून पहिलंच पत्र होतं', असं पीटर मुखर्जी यांचे दुसरे वकील आबाद यांनी सांगितलं आहे. 'इंद्राणी मुखर्जी पीटरला सलग पत्र लिहित असून आपण आणि पीटर निर्दोष असल्याचं बोलत आहे. इंद्राणीने 21 डिसेंबरला जीवघेणा आजार होण्याची भीती व्यक्त केल्यानंतर पीटरने अखेर पत्र लिहिलं', असंही सांगितलं आहे.
इंद्राणी मुखर्जीला शीना बोरा हत्येप्रकरणी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. तिच्यासोबत पुर्व पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम रायलादेखील अटक करण्यात आलं होतं. नोव्हेंबरमध्ये पीटरला सहआरोपी करण्यात आलं. पीटर आणि इंद्राणी दोघेही कारागृहात असून पीटर आर्थर रोड कारागृहात तर इंद्राणी भायखळा कारागृहात आहे.
डिसेंबर 2015 पासून इंद्राणीने 40 पत्रं पाठवली आहेत. पण जेव्हा पीटरने तिच्या पत्रांना उत्तर देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार पत्र पाठवलं तेव्हा अखेर तिने पत्रव्यवहार थांबवला असं सुत्रांकडून कळलं आहे. पीटरनेदेखील अटक होण्याआधी इंद्राणीला काही पत्र पाठवली होती मात्र त्यानंतर कोणतच पत्र पाठवलं नव्हतं. 21 डिसेंबरला इंद्राणीने आपल्या जीवघेण्या आजाराबद्दल पत्र लिहिलं होतं. ज्यानंतर पीटरने पत्राद्वारे उत्तर दिलं होतं. पीटर मुखर्जीच्या जामिन याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.