मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या कोठडीत सोमवारी तीन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. शीनाच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा दावा सीबीआयने केला. भारत आणि इंग्लंडमध्ये पीटर आणि इंद्राणीची मालमत्ता आहे. मात्र या मालमत्तेबाबत दोघांकडूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी अधिक चौकशी करण्याची सीबीआयची मागणी मान्य करत न्या. महेश नातू यांनी पीटरच्या कोठडीत २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली. सोमवारी सीबीआयतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, राहुल हा पीटरचा मुलगा आहे. राहुल आणि शीनाचे प्रेमप्रकरण पीटरला माहिती होते. शीनाच्या अचानक गायब होण्यामुळे अस्वस्थ असलेल्या राहुलची तळमळ पीटरला दिसत होती. त्यामुळे कुटुंबातील जवळची व्यक्ती असलेल्या राहुलला शीनाशी माझे बोलणे झाले, ती मजेत आहे. तिची काळजी करु नको, अशी थाप मारण्याची पीटरला काय गरज होती? २२ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणी आणि पीटर यूकेला गेले होते. त्यानंतर २३ तारखेला इंद्राणी मुंबईत परतली. २४ तारखेला शीनाची हत्या होते. त्यापाठोपाठ २६ तारखेला पीटर मुखर्जी मुंबईत परततात. या हत्याकांडादरम्यान पीटर आणि इंद्राणी दरम्यान तब्बल १८ ते २० मिनिटे संभाषण झाले आहे. एरवी त्यांच्या संभाषणामध्ये दोन मिनिटांपेक्षा जास्त बोलणे झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे शीनाच्या हत्येबाबतच हे संभाषण झाल्याचा संशय आहे. पीटरनी भारतासह इंग्लंडमध्ये असलेल्या मालमत्तेची माहिती दिली आहे. ही मालमत्ता कोठून आली, याबाबत दोघांनीही माहिती दिलेली नाही, त्यांचे तपासात सहकार्यही कमी आहे. हा व्यवहार शीनाच्या हत्येमागे असल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आलो. त्यामुळे पीटरच्या चौकशीतून याच गूढ उकलण्यास मदत होईल, असे सिंह यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. यावर बचाव पक्षाचे वकील अमित देसाई यांनी सिंह यांचे आरोप फेटाळून लावले. इंद्राणी मुखर्जीच्या अटकेपासून पीटर मुखर्जी तपासास सहकार्य करत आहे. त्यात मुंबई पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये पीटर मुखर्जींच्या विरोधात एकही लाईन नाही. शिवाय राहुलने सादर केलेले रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांकडेही होते. या रेकॉर्डिंगबाबत अधिक तपास करतेवेळी स्वत: पीटर राहुलसोबत खार पोलीस ठाण्यात ये-जा करत होते. त्यात सीबीआयने केलेल्या तपासात यापलीकडे कुठलाही नवा पुरावा समोर आणलेला नाही. त्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, एखादा व्यक्ती तपासास सहकार्य करत असेल त्याला कोठडीची गरज नाही. त्यामुळे केवळ कॉल्स तपशिलाच्या आधारावर कोठडीत वाढ करणे चुकीचे आहे.
पीटर मुखर्जीच्या कोठडीत वाढ
By admin | Published: November 24, 2015 2:51 AM