मुंबई : सीबीआयने नोव्हेंबरपासून शीना बोरा हत्याप्रकरणातील काही साक्षीदारांची नावे गुप्त ठेवल्याने, विशेष सीबीआय न्यायालयानेही या साक्षीदारांच्या जबाबाची प्रत देण्यास पीटरला नकार दिला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पीटरने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.सरकारी वकील ज्या साक्षी-पुराव्यांच्याआधारे आरोप सिद्ध करणार आहेत, ते सर्व साक्षी-पुरावे आरोपीलाही त्याच्या बचावासाठी देण्यात येतात, असा युक्तिवाद पीटरच्या वकिलांनी विशेष सीबीआय न्यायालयात केला होता. मात्र, विशेष न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केल्याशिवाय गुप्त साक्षीदारांच्या जबाबाची प्रत देणार नाही, असे स्पष्ट बजावत पीटरचा अर्ज फेटाळला.तपास यंत्रणा जोपर्यंत सर्व साक्षी-पुराव्यांची प्रत पीटरला देत नाही, तोपर्यंत आरोपींवर आरोप निश्चित करता येऊ शकत नसल्याचे पीटरने उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीने पीटर व मिखेल बोरा यांच्या घेतलेल्या मुलाखतीची सीडी पीटरला देण्याचा निर्देश विशेष न्यायालयाने सीबीआयला दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी करत, सीबीआयने गुरुवारी पीटरला मुलाखतीची सीडी दिली.या खटल्यातील साक्षीदार क्रमांक ११ सीबीआयसाठी अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यामुळे सीबीआयने या साक्षीदाराचे नाव आणि जबाब अत्यंत गोपनीय ठेवले आहे, तर याच साक्षीदाराचे नाव आणि जबाबाची प्रत देण्याची मागणी पीटरने केली आहे. पीटरच्या या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुट्टीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पीटर शीनाच्या हत्येवेळी युनायटेड किंगडममध्ये असला, तरी तो इंद्रायणीसोबत मोबाइलवरून सतत संपर्कात होता. त्यामुळे शीनाच्या हत्येच्या कटात तो सहभागी होता.
गुप्त साक्षीदारांच्या जबाबासाठी पीटरची उच्च न्यायालयात धाव
By admin | Published: November 03, 2016 5:32 AM