ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणा-या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करणारी याचिका अर्थहीन असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे या पुरस्कार वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी हा सोहळा पार पडेल. एवढंच नाही तर केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून याचिका दाखल करत कोर्टाचा वेळ फुकट घालवल्याबद्दल पद्माकर कांबळे व राहूल पोकळे या दोघा याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
शेखर जगताप या वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने पुरंदरे या पुरस्कारासाठी पात्र नसल्याची भूमिका मांडली. पद्म पुरस्कार मिळालेल्याच महाराष्ट्र भूषण द्यायला हवं असा दावा त्यांनी केला. त्यांना मध्येच थांबवत न्यायाधीशांनी बाबासाहेब पुरंदरे गेली ४० - ५० वर्षे कार्यरत आहेत, त्यांचं सगळं काम निरर्थक, बिनउपयोगाचं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का असा प्रश्न विचारला.
हायकोर्टात सुनावणी सुरू असली व सरकारच्या वतीने अनिल सिंग बाजू मांडत असले तरी या याचिकेचे भविष्य ठरल्यात जमा असून ती संपूर्णपणे फेटाळली जाण्याची शक्यता आहे.
या सुनावणीदरम्यानचे ठळक मुद्दे:
- याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचा दीड तास वाया घालवला आहे याचिका कर्त्यांजवळ कोणतेही ठोस मुद्दे नाहीत - बाबासाहेब पुंरदरे यांच्या बाजूने उदय वारूंजीकर यांचा युक्तीवाद
- बाबासाहेब पुरंदरे यांच्या कर्तृत्वाबाबत प्रश्न कसे उपस्थित करायचे? याचिका म्हणजे पब्लिसिटी स्टंट असून ती फेटाळली गेली पाहिजे - अनिल सिंग यांनी न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने मांडली बाजू.
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार विरोधातील याचिकेत कोणताही अर्थ नाही. पुरंदरेंनी राज्यासाठी काहीही केलं नाही असं तुम्हाला का वाटतं? त्यांनी आयुष्याची ५० वर्ष एका कामात घालवली ते काम मोठं नाही का? न्यायाधीशांचा याचिकाकर्त्यांना सवाल
- 'पुरंदरे पुरस्काराचे निकष पूर्ण करत नाहीत. वय हे पुरस्कार देण्याचा निकष ठरू शकत नाही. पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्यांना प्राधान्य दिलं जावं - याचिकाकर्त्यांच्या बाजूने शेखर जगताप करत आहेत युक्तीवाद.