मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज्याचे पर्यावरण तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील शांतता भंग केल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आली आहे.
राज्यात दंगल व हिंसाचाराची परिस्थिती निर्माण
ठाकरे पिता-पुत्र आणि राऊत यांच्या धमक्यांमुळे बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. बंडखोर आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि शवविच्छेदनासाठी ते थेट शवागृहात पाठवले जातील, अशी धमकी राऊत यांनी दिली आहे. अशाप्रकारे धमक्या देऊन, शिवसैनिकांना बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने करण्यास प्रवृत्त करून ठाकरे पिता-पुत्र आणि राऊत राज्यात दंगल व हिंसाचाराची परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, असंतुष्टतेच्या कारणास्तव शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात या तिघांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मज्जाव करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत असून त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले जात आहेत, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.