दीप्ती देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपा सरकारविरुद्ध पवित्रा घेत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाविरुद्ध थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित न करण्याचा आदेश फडणवीस सरकारला द्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी याचिकेत केली आहे.नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवदे ग्रामपंचायत व ९२ शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाविरुद्ध अॅड. रामेश्वर गीते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महामार्गासाठी सुमारे ८४ टक्के जमीन शेतकी असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारने या महामार्गासाठी पर्यायी जागा शोधावी किंंवा प्रस्तावित महामार्गाला समांतर असलेल्या घोटी-सिन्नर याच महामार्गावरून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विकास करावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.प्रस्तावित महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन राखडी, काळी, गुलाबी आणि लाल रंगाची आहे. या रंगांची जमीन डाळी व धान्ये घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. येथील शेतकरी याच जमिनीच्या जिवावर उदरनिर्वाह करतात. बहुतांशी शेतकरी भूसंपादन करण्याच्या निर्णयाविरुद्ध असल्याने याचिका प्रलंबित असेपर्यंत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन न करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.
‘समृद्धी’विरोधात याचिका
By admin | Published: June 10, 2017 2:52 AM