भिवंडी : भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेबाबत काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता असतांना मात्र यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातही २०१३ मध्ये दाखल झालेली याचिका त्यांनी संसदेत माफी मागितल्याने निकाली काढण्यात आली असल्याची माहिती आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा देशात हिंदू दहशतवाद पसरविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेत असल्याचा आरोप शिंदे यांनी २० जानेवारी २०१३ मध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात केला होता. या आरोपामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा व जातीय तेढ वाढण्याचा धोका संभवतो, असा आरोप करत मुरलीधर नांदगावकर यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली होती. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही शिंदे यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याने याचिकेत दोघांनाही आरोपी केले होते. परंतु शिंदे यांनी संसदेमध्ये माफी मागितल्याने भिवंडी न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करत टीका केली होती. त्याबाबत दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. (प्रतिनिधी)
शिंदे यांच्याविरुद्धची याचिका काढली निकाली
By admin | Published: November 17, 2016 5:12 AM