ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ - विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात नागपूरातील जय जवान जय किसान संघटनेचे अरुण वनकर, पर्यावरण कार्यकर्ते अंकिता शहा आणि टोरम नायडू यांनी अॅड असीम सरोदे व अॅड स्मिता सिंगलकर यांच्या मदतीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे बुधवारी याचिका दाखल केली.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पर्यावरण संमती (Enviornment Clearence) शिवाय स्टेडियमचे बांधकाम केले असून २००८ पासून स्टेडियमचा बेकायदेशीर वापर सुरू आहे. तसेच, २००८ पासून जवळपास कायद्याचे उल्लंघन करुन या स्टेडियमवर ३० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आणि कमाई केली. याचबरोबर या स्टेडियमवर येत्या २५ आणि २७ मार्चला होणारे टी-२० वर्ल्डकपचे सामने रद्द करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.