औरंगाबाद: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संगमनेर सत्र न्यायालयानं इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. पण, आता अंनिस आणि सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
इंदोरीकर महाराज यांनी एका किर्तनादरम्यान पुत्र प्राप्तीसंदर्भात वक्तव्य केलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची या प्रकरणातू निर्दोष मुक्तताही केली होती.
यानंतर 'आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे, असे म्हणत अंनिसने निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीनेही जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. गुरूवारी सरकारी पक्षाच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.