नागपूर : राजकीय पाणी ढवळून काढणाऱ्या सिंचन घोटाळ््यासंबंधी जनहित याचिका दाखल करणारे शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ श्रीकांत जगन्नाथ खंडाळकर (वय ५२) यांचा मृतदेह रविवारी दुपारी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने उपराजधानीत खळबळ उडाली. खंडाळकर यांचा मृत्यू घातपाताचा प्रकार आहे की, आत्महत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पोलिसांना त्यांच्याजवळ ‘सुसाईड नोट’ आढळली. त्यात त्यांनी गंभीर आजारामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.अॅड. खंडाळकर नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ११.३० ला आपल्या घरून कोर्टात जातो, असे सांगून निघाले. मात्र, रात्र झाली तरी ते घरी परतले नाहीत. सायंकाळपर्यंत त्यांचा मोबाईलवर ‘नो रिप्लाय’ होता. नंतर स्वीच्ड आॅफ झाल्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांचे थोरले बंधू राजेंद्र जगन्नाथ खंडाळकर (वय ६०) यांनी सीताबर्डी ठाण्यात अॅड. श्रीकांत खंडाळकर बेपत्ता असल्याची तक्रार रात्री नोंदवली. त्यानंतर घरचे आणि पोलीसही त्यांचा शोध घेत होते. सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धडपडणारे वकील अशी अॅड.खंडाळकर यांची प्रतिमा होती. बहुचर्चित सिंचन घोटाळ््यासह त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे त्यांचे अनेक हितशत्रू तयार झाल्याची चर्चा असल्याने पोलिसांचेही दडपण वाढले होते. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात कचऱ्याच्या ठिकाणी एक मृतदेह पडून दिसल्याचे एका व्यक्तीने तेथील पोलिसांना सांगितले. तपासांती तो मृतदेह अॅड. खंडाळकर यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली.
सिंचन घोटाळ्यातील याचिकाकर्त्या वकिलाचा मृत्यू
By admin | Published: November 30, 2015 3:09 AM