ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणारी घट भारतासाठी दिलासा देणारी ठरली आहे. पेट्रोलची किमत प्रति लिटर ७४ पैशांनी तर डिझेलची किंमत प्रति लिटर १ रुपया ३० पैशांनी कमी करण्यात आली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलची किमत प्रति लिटर ६९.३८ रुपये तर डिझेल ५५.८० रुपये प्रतिलिडर मिळेल.
तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.
दहा दिवसांपूर्वीच म्हणजेच ५ एप्रिललाच पेट्रोल प्रति लिटर २.१९ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर ९८ पैशांनी महागलं होतं. त्या तुलनेत इंधनाच्या दरात झालेली कपात खूपच कमी आहे.त्याचप्रमाणे १६ मार्च रोजीही पेट्रोलचे ३.०७ रुपयांनी आणि डिझेलचे दर १.९० रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर १७ फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केले होते. तेव्हा पेट्रोलचे दर ३२ पैशांनी स्वस्त झाले होते. मात्र डिझेल २८ पैशांनी महागलं होतं.