ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 31 - पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असतानाच आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 1.23 रुपयांनी तर डिझेल 0.89 रूपयांनी महाग झाले आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दराचा आणि रूपया- डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेऊन हे दर निश्चित केले जातात.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारला पाठवलेला आहे. त्यासाठी देशातील पाच शहरात प्रायोगिक तत्वावर या प्रस्तावानुसार इंधन विक्री करण्याचा शुभारंभ 1 मेपासून होणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर तो देशभरात राबविण्यात येणार आहे. पॉण्डेचरी या केंद्रशासीत प्रदेशासह आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, राज्यस्थानातील उदयपूर, झारखंडमधील जमशेदपूर तसेच चंदीगड येथे 1 मेपासून हा प्रयोग राबविला जाणार आहे. डेली डायनेमिक प्राइसिंग असे या प्रयोगाचे नाव असून, देशाच्या विविध भागातील अनुभव पाहून सरकार पुढील पाऊल उचलणार आहे.